मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठे नुकसान झाले आहे.
आज थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव बालगंधर्व नाट्यमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायं ६ वाजण्याच्या सुमारास त्यांचावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
दिवंगत विक्रम गोखले यांचा मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपट सृष्टीत मोठा दबदबा होता. अनेक चित्रपटात त्यांनी अनेक व्यक्तीरेखा जिवंत केल्या होत्या, त्यामुळे ताकदीचा कलाकार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहण्यात येत होते. मालिका आणि चित्रपतील अनेक अनेक भूमिका प्रेक्षकांना अजूनही भुरळ घालणाऱ्या आहेत. अग्निहोत्र नावाच्या मालिकेत त्यांनी संकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका अजूनही अनेकांच्या मनात घर करून बसली आहे.
कठोर आवाज आणि संवादफेक ही दोन त्यांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. ‘या सुखानों या’, ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’ या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना मोहिनी घातली. ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अर्धम’, हम दिल दे चुके सनम अशा हिंदीतील चित्रपटात काम करताना आपला चाहते त्यांनी भारतभर निर्माण केले. त्यांनी ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. सध्या विक्रम गोखलेंचा ‘गोदावरी’ सिनेमा सिनेमागृहात असून या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.