पुणे : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचे काका, ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही.कृष्णम राजू (वय-८२) यांचे आज रविवारी (ता.११) पहाटे पावणे चारच्या सुमारास निधन झाले आहे. यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कृष्णम राजू यांची शनिवारी (ता.१०) रात्री प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, राजू यांची आज रविवारी (ता.११) पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास प्राणज्योत मावळली.
कृष्णम राजू हे सिनेमात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. १९९६ मध्ये त्यांनी ‘चिलाका गोरनिका’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णम राजू यांनी जवळपास १८३ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, कृष्णम राजू हे अभिनेता प्रभासचे काका होते. कृष्णम राजू यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा, साऊथचे दिग्दर्शक मारुती यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच या अभिनेत्याच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीतील तमाम कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली आहे.