Siddharth Jadhav : मुंबई : गोव्यात ‘इफ्फी’भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. अनेक कलाकार तिथं हजेरी लावत आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा चित्रपट ‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट पहिल्यांदाच‘इफ्फी’सोहळ्यात दाखवण्यात आला. त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधव प्रचंड खुश आहे. सध्या ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
सिद्धूने त्याची इफ्फी सोहळ्याची खास झलक त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांबरोबर सिद्धार्थचा सन्मान होत असल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबत अदिती राव हैदरी, विजय सेथुपती,अरविंद स्वामी, संगीतकार ए.आर.रेहमान दिसत आहेत. सिद्धार्थ या व्हिडीओमध्ये सांगतो की, “मी आयुष्यात पहिल्यांदाच इफ्फीला आलो. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आमचा ‘गांधी टॉक्स’ चित्रपट…आमच्या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग या सोहळ्यात करण्यात आलं. मला खरंच खूप जास्त आनंद झाला आहे. सगळ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार!”
एवढ्या मोठ्या सोहळ्यात सिद्धार्थचा सत्कार होत असल्याचं पाहून नेटकरी आणि अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अंगावर शहारे आले भावा”, “मराठी माणसाचं नाव असंच पुढे ने सिद्धू”, “खूप अभिमान वाटतोय तुझा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सिद्धार्थच्या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच मराठी कलाकारांनी सुद्धा त्याला ‘गांधी टॉक्स’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या महोत्सवाचं आयोजन यंदा गोव्यामध्ये करण्यात आलं आहे. यामध्ये ‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट पहिल्यांदाच दाखवण्यात आला. या सिनेमात अरविंद स्वामी, विजय सेथुपती, अदिती राव हैदरी आणि मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलं आहे. त्यामुळे या सगळ्या दिग्गज कलाकारांना इफ्फी सोहळ्यात विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. हे सर्व कलाकार गोव्यात ‘इफ्फी’साठी हजर झाले होते.