मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याची प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत होते. अशातच श्रेयसची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याची पत्नी दिप्ती तळपदेने दिली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दिप्तीने पतीच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देताना म्हटले की,”माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि शुभेच्छांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल.
दिप्ती पुढे म्हणाली,”या कठीण काळात बेलव्यू रुग्णालय आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्तवाचा ठरला. त्यामुळे त्यांचीही मी कृतज्ञ आहे. पण चाहत्यांना माझं भावनिक आवाहन आहे की, आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करावा. तुमचा अतूट पाठिंबा हाच आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्त्रोत आहे”. असंही दिप्तीने म्हटले आहे.