मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे झालेल्या 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात श्रेयस तळपदेसह अभिनेते आलोक नाथ आणि आणखी 22 जणांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेने पाच वर्षांत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून बागपत जिल्ह्यातील 500 हून अधिक नागरिकांची 5 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सोसायटीने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी पैसे गुंतवले, मात्र गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त एजंटांनी बागपत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ हे या सोसायटीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत होते. ते वारंवार प्रचार कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत कंपनीच्या गुंतवणूक योजनांचे प्रमोशन करत असत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या प्रसिद्धीवर विश्वास ठेवत पैसे गुंतवले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अधिक माहिती अशी की, या सोसायटीने 27 नोव्हेंबर 2024 पासून अचानक आपले व्यवहार थांबवले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी संबंधित सोसायटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पुढून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
फसवणुकीच्या या प्रकरणात बागपत पोलिसांनी एकूण 22 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबत चौकशी सुरू आहे.







