मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक सावन कुमार टाक (वय ८६) यांचे काल (गुरुवारी) सायंकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.सावन कुमार यांना फुप्फुसाच्या संसर्गाचा त्रास होत होता. त्यांना अंधेरीतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
‘सौतन’, ‘सनम बेवफा’, ‘साजन बिना सुहागन’आदी चित्रपटांची त्यांनी निमिर्ती केली होती. त्याचे ते दिग्दर्शकही होते. गेल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध चित्रपट बनविले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.२६) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे भाचे नवीन कुमार यांनी दिली. त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांची गीतेही त्यांनी लिहिले आहेत.
९ ऑगस्ट १९३६ रोजी जयपूर येथे सावन कुमार टाक यांचा जन्म झाला. निर्माता म्हणून ‘नौनिहाल’ हा पहिला चित्रपट त्यांनी बनवला. १९७२ मधील ‘गोमती के किनारे’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. संजीव कुमार, मीना कुमारी, राजेश खन्ना, नूतन, जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा, सलमान खान यांसारख्या सर्व बडे अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम करून लोकप्रिय चित्रपट दिले. २००६ मध्ये सलमान खानच्या ‘सावन: द लव्ह सीझन’ या त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता.