पुणे प्राईम न्यूज डेस्क: अभिनेत्री सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची जोडी एका नव्या चित्रपटामुळे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गुलकंद’ या चित्रपटात दोघांचे पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन मिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचाही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात सईसोबत काम करण्याच्या अनुभवावर समीर चौघुले म्हणाला, सई आणि माझी ओळख ‘फू बाई फू’ पासूनची आहे. त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो. आता ‘गुलकंद’च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला. यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सहकलाकार आणि मैत्रीण आहे. दरम्यान, सई आणि समीरला एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. गुलकंद हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.