Raj Kundra: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना 60 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी चौकशीसाठी बोलावले असून, या चौकशीत तब्बल पाच तास त्यांची सखोल झडती घेण्यात आली.

पाच कंपन्यांवर संशय
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही रक्कम सतयुग गोल्ड, विहान इंडस्ट्रीज, इसेन्शियल बल्क कमोडिटीज, बेस्ट डील टीव्ही आणि स्टेटमेंट मीडिया या पाच कंपन्यांमार्फत वळवण्यात आली. राज कुंद्रा यांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची कबुली दिली असली, तरी या निधीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी व अनुत्पादक खर्चासाठी झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
शिल्पा शेट्टीही चौकशीत? (Shilpa Shetti)
या प्रकरणात शिल्पा शेट्टीचे नावही समोर येत असून, समोर आलेल्या माहितीनुसार ती या कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर आहे. त्यामुळे तीचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तिला अद्याप कोणताही समन्स बजावण्यात आलेला नाही.
खर्चाचा तपशील संशयास्पद
राज कुंद्राच्या बँक व्यवहारांची तपासणी दरम्यान काही संशयास्पद व्यवहार उघडकीस आले आहेत. यामध्ये 3.15 कोटी रुपये एका गोदामासाठी, 20 कोटी रुपये प्रसारण संबंधित खर्चासाठी, माटुंगा येथील आलिशान कार्यालयाच्या भाड्यावरील खर्च यांसारख्या खर्चांची चौकशी सुरू असून, हे व्यवहार बेकायदेशीर आर्थिक वापरात मोडतात का? याचा तपास केला जात आहे.
दीपक कोठारी यांच्या तक्रारीनंतर प्रकरण उजेडात
हे प्रकरण उद्योजक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून उघड झाले. त्यांनी आरोप केला की, बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले गेले, पण प्रत्यक्षात तो निधी इतरत्र वळवण्यात आला.
पुन्हा चौकशीची शक्यता
राज कुंद्रांना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील तपास अधिक खोलवर जात असून, पुढील काही दिवसांत आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आले होते. आता 60 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांची अडचण पुन्हा वाढली आहे.
हेही वाचा: 1xBet Betting App Case: युवराज सिंग ईडीच्या रडारवर; या’ सेलिब्रिटींनाही बजावले समन्स







