पुणे : पुण्यातील (Pune Crime)vनामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने (Pune Income Tax Raid) धडक कारवाई करत अचानक छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रोडवरील ICC टॉवरमधील कार्यालयात तसेच सिंध सोसायटीमधील निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकला. त्याचबरोबर, मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन परिसरातील कार्यालयावर देखील ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यांमागील नेमकं कारण अधिकृतपणे अद्याप समोर आलेले नाही. तथापि, मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पाच्या संदर्भात यापूर्वी ईडीने मित्तल ब्रदर्स ग्रुपची चौकशी केली होती. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा) यांच्या निर्देशानंतरच अलीकडील कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पाचे प्रवर्तक असलेल्या ऑनेस्ट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तब्बल 90 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. फ्लॅट्सचा ताबा वेळेत न दिल्यामुळे कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आला होता. आता पुण्यातील या धडक छाप्यांनंतर बांधकाम क्षेत्रातील घडामोडींना आणखी वेग येणार आहे.







