पुणे : ‘तालचक्र’ हा तीन दिवसीय संगीत महोत्सव येत्या १८ ते २० नोव्हेंबर या दरम्यान पुण्यात होणार आहे, महोत्सवाचे आयोजक पं. विजय घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पहिल्या दिवशीचे कार्यक्रम टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे कार्यक्रम कोथरूडमधील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होतील, असे घाटे यांनी सांगितले.
तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
तबला वादक पांडुरंग पवार, पखवाजवादक सुखद मुंडे, बासरीवादक राकेश चौरासिया, ढोलकीवादक विजय चव्हाण आदी या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.
प्रसिद्ध तालवाद्य वादक शिवमणी, तबलावादक पं. विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांच्या एकत्रित कलाविष्काराने महोत्सवाचा समारोप होणार आहे.