Pune News : पुणे : मनातल्या भावना शब्दांच्या चिमटीत पकडून कधी हशा तर कधी टाळ्या घेत रंगलेल्या कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. नवरसाच्या नव कवितांनी कऱ्हा नदीला जणू साहित्याचा महापूर आला होता. निमित्त होते रौप्यमहोत्सवी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे… प्रेम, पाऊस, निसर्ग, हास्य, विडंबन, सामाजिक कवितांनी कऱ्हाकाठ मंतरला होता.
कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ कवी बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षेतेखाली सुरु झालेल्या कविसंमेलनाची रंगत दशरथ यादव व हेमंत ताकवले यांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने आणखी वाढली.
अजुनी पाहा वाट जराशी
अछे दिन येणार आहेत
सारा देश विकल्यावर
आपण कुठे राहणार आहोत…
दशरथ यादव यांची सद्यस्थितीवर भाष्य करणारी अच्छे दिन… कविता दाद मिळवून गेली. अरुण कटारे यांनी ‘ती उपाशी झोपलेली लेकरे होती’ तसेच ‘भिकारी’ ही गजल सादर केली. तुझ्याच आसवांची नदी जिवंत आहे… प्रेमावरी तुझ्या या, कवी जिवंत आहे… ही राजेंद्र सोनवणे यांची कविता दाद मिळवून गेली.
डॉ. स्वाती शिंदे-पवार, स्वाती बंगाळे, राजगौरी जाधव, नीता सुभागडे, जगदीप वनशीव, वसंत पाटील, शुभानन, राजेंद्र सोनवणे, गोरक्ष जाधव, डॉ. दत्ता सलगर, अनिल कदम, डॉ. रुता खांडेकर्, नसरीन अन्सारी, शरद पाडसे, शिवाजी झुरंगे, सुरेश धोत्रे, संजय सोनवणे, अशोक शर्मा, संजय जाधव, दत्ता पांढरे आदी कवींनी कविता सादर केल्या. याप्रसंगी आमदार संजय जगताप यांनी चारोळी सादर करुन् दाद मिळवली.
या वेळी विजय कोलते, डॉ. सागर देशपांडे, बाळासाहेब मुळीक, कलाताई फडतरे, प्रकाश खाडे, गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.