लहू चव्हाण
पाचगणी : सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी गोडवली (ता.महाबळेश्वर) येथे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘सुभेदार’ या चित्रपटाचे ग्रामस्थ व चित्रपट टीमच्या उपस्थितीत स्क्रिप्ट पूजन करण्यात आले.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोडवली गावच्या प्रवेशद्वारावर ‘सुभेदार’ गड आला पण… या चित्रपटाचे कलाकारांचे स्वागत केले. ढोल ताशांच्या वाद्यात चित्रपट टीमचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर असणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अर्धं पुतळ्यासमोर आगमन झाले. आलेल्या कलाकारांच्या उपस्थितीत नरवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू असून आता ‘सुभेदार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे मान्यवरांच्या हस्ते स्क्रिप्ट पूजन करण्यात आले.
या चित्रपटात तानाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. यावेळी दिग्दर्शक दिग्दपाल लांजेकार, सहदिग्दर्शक वैभव गलांडे पाटील, स्मिता शेवाळे, अजय पुरकर, समीर धर्माधीकारी, येसाजी कंक यांचे वंशज राहुल कंक, नरवीर तानाजी मालुसरे कोअर कमिटीचे अघ्यक्ष अंकूश मालुसरे, कुणाल मालुसरे, रविंद्र मालूसरे, संदिप मालुसरे, गणेश मालुसरे, संतोष मालुसरे, बाळासाहेब मालुसरे, शरद कदम, गणेश खुंटवट व गोडवली ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत सदस्य, तपनेश्वर सेवा मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
खरा इतिहास पोचविण्यासाठी चित्रपटाची निर्मिती…
स्क्रिप्टचे पूजन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जयघोषांनी परीसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना अंकुश मालुसरे म्हणाले ‘ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तानाजी, द अनसंग वॉरियर* हया चित्रपटात चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला. तो खोडून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने हा ‘सुभेदार गड आला पण’ हा चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.