पुणे प्राईम न्यूज: दाक्षिणात्य अभिनेता विजयचा तामिळ चित्रपट ‘लिओ’ चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असून रिलीजपूर्वीच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. ‘लिओ’ रिलीज व्हायला अजून पाच दिवस बाकी आहेत. परंतु, आत्तापर्यंत त्याची करोडोंची तिकिटे विकली गेली आहेत. विजयचा ‘लिओ’ अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असे दिसते आहे. नवीन रिपोर्ट्समध्ये, चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबाबतचा डेटा समोर आला आहे.
सैकनिल्क रिपोर्टनुसार, भारतात आतापर्यंत लिओची १.२ कोटी किमतीची तिकिटे विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार शुक्रवारी लिओच्या 446 तमिळ शोची 64,229 तिकिटे विकली गेली आहेत. यासह चित्रपटाचे कलेक्शन 1.20 कोटी रुपये झाले आहे.
चेन्नईतून चांगला प्रतिसाद मिळाला:
रिपोर्ट्सनुसार, लिओला चेन्नईतून उत्तम प्रतिसाद मिळाला. या शहरातून 70 टक्के ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. लिओचा ट्रेलर मदुराईमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जिथे आतापर्यंत 34 टक्के ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे.
लिओच्या कलाकारांबद्दल बोलायचे तर 2021 नंतर विजय आणि लोकेश कनागराज यांचे रियूनियन होणार आहे. यात विजयसोबत त्रिशा कृष्णनही दिसणार आहे. या चित्रपटात विशेष बाब म्हणजे संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त लिओ या चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने गेल्या वर्षी केजीएफ चॅप्टर- 2 मधून कन्नड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. अर्जुन सरजा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन हे देखील लिओमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.