मुंबई: सध्या जिथे पाहावं तिथे ‘लाडकी बहीण’ योजनेचीच हवा आहे. पण आता या सरकारी योजनेला टक्कर द्यायला एक घरगुती ‘योजना’ आली आहे, ती म्हणजे ‘लाडकी विहीण योजना’. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं राहावं लागणार नाही, तर थेट नाट्यगृहात जाव लागणार आहे. कारण, मराठी रंगभूमीची ‘कॉमेडी क्वीन’ निर्मिती सावंत पुन्हा एकदा एक सुंदर नाटक घेऊन आल्या आहेत.

‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’ आठवतंय? ज्या नाटकाने अख्खा महाराष्ट्र वेडा केला होता, त्या नाटकाची टीम म्हणजे निर्मिती सावंत, दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते दिलीप जाधव हे त्रिकूट अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आलं आहे. त्यामुळे, ‘गंगूबाई’चा तोच गावरान ठसका आणि विनोदाची तीच तुफान बॅटिंग पुन्हा पाहायला मिळणार, हे आता नक्की झालंय.

अधिक माहितीसाठी पाहा पोस्ट:

लेखक प्रथमेश शिवलकर यांनी हे नाटक कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिलं आहे. दोन विहिणींमधलं प्रेम, त्यांच्यातली जुगलबंदी आणि कौटुंबिक गमती-जमती असा हा हलकाफुलका प्रवास आहे. निर्मिती सावंत यांच्या मते, “नाटकावरचं प्रेम कधीच कमी होत नाही, फक्त चांगल्या नाटकाची वाट पाहत होते आणि ही ‘लाडकी विहीण योजना’ मला पहिल्या वाचनातच भावली, असे त्यांनी सांगितले.







