मुंबई : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील मानपाडा भागात शिवसेना विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आता पोलिसानां महत्त्वाचा दुवा सापडला आहे. मिरा रोड भागातून 3 महिलांसह 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण मुख्य संशयित आरोपी पप्या शिंदे याच्या संपर्कात होते. पप्या शिंदे आणि मृत प्रदीप पूर्णेकर हे पूर्वीचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, या संशयितांच्या चौकशीतून हत्येमागील खरे कारण आणि मुख्य सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे.

पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची संपूर्ण जबाबदारी आता विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरासिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील या पथकात 23 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी FIR मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे जोडल्याने या घटनेला मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

दरम्यान शिंदे दाम्पत्याची नावे गुन्ह्यात समाविष्ट होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता.शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यामुळे पोलिसांवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. अखेर पुरवणी एफआयआरमध्ये नावे समाविष्ट केल्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.






