नवी दिल्ली : रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. हत्येची जबाबदारी घेण्याच्या बदल्यात त्याने तिघांना 15 लाखांचे आमिष दाखविले होते. प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याला 11 जून रोजी अटक करण्यात आली आहे.
एका फूड डिलेव्हरी एजंटने रेणुका स्वामी यांचा मृतदेह बंगळुरूमधील एका नाल्यात पडलेला पाहिला होता, जिथे कुत्रे त्याचे लचके तोडत होते. त्याने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेणुका स्वामीवर दर्शनची को-स्टार आणि गर्लफ्रेंड पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला त्रास देणे आणि तिच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलणे हे रेणुका यांच्या हत्येचे प्रमुख कारण असू शकते.
रेणुका स्वामीची हत्या करण्यापूर्वी दर्शनने राघवेंद्र उर्फ रघू नावाच्या व्यक्तीचा वापर करून रेणुकाची माहिती गोळा करून आपले काम पूर्ण केले होते. रघू त्याच्या फॅन क्लबशी संबंधित आहे. रघूने त्याला घराजवळून उचलून नेल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. रेणुका स्वामीची हत्या करण्यापूर्वी त्याला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
रेणुका स्वामी हत्येप्रकरणी पोलिसांनी दर्शनसह 13 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दोषींना कोणतीही दयामाया न ठेवता कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.’ राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दर्शन आणि इतर आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.