मुंबई : इंडियन क्रश म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. रश्मीकाने एका मुलाखतीमध्ये लोकांना कलाकारांनी केलेली प्रत्येक गोष्ट आवडेलच असे नाही म्हणत अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
मागील काही दिवसांपासून रश्मिकाला अनेक गोष्टींवरून ट्रोल करण्यात येत आहे. रश्मिकाने ‘कांतारा’ हा चित्रपट पाहिला नाही यावरूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. तर आता तिला ‘कूर्ग पर्सन ऑफ द २०२२’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे देखील अनेक लोकांना खटकल्याचे दिसले.
रश्मिका म्हणाली, “मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रत्येक कलाकार हा सगळ्यांना आवडेलच असे काही नाही. आणि आपण त्या पद्धतीने हट्ट धरणे देखील योग्य नाही. काही लोक तुमच्यावर भरभरून प्रेम करतील तर काही लोक तुमचा तिरस्कार देखील करतील. याउलट कधी कधी तिरस्कार करणारी लोकही प्रेम करतात आणि प्रेम करणारी लोक ही तिरस्कार करत असतात. आम्ही सेलिब्रिटीज आहोत, आम्हीच लोकांशी संवाद साधतो. हा सेलिब्रिटी असण्याचा शाप आहे आणि वरदानसुद्धा आहे. असे रश्मिकाने सांगितले आहे.
दरम्यान, रश्मिका सध्या सुपरस्टार विजयच्या ‘वारीसु’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तसेच रश्मिका “मिशन मजनू’, ‘पुष्पा – द रुल’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.