Gautami Patil सोलापूर : आपल्या अदाकारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील हिची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. पण मोडलिंब येथे आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कलावंतांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या धांगडधिंग्याला लगाम लागणार असल्याचे म्हटले जात आहे. (Gautami Patil)
राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये १८ वर्षाखालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही. तमाशा थिएटरमध्ये डीजेला बंदी करण्यात आली. तमाशा कलावंतांना समाजामध्ये तेवढाच मान सन्मान मिळायला हवा. त्याचबरोबर या कलावंतांच्या मुलांना शिक्षण सन्मानाने घेता यावे यासाठी सरकारने आम्हाला पाठबळ देणे गरजेचे आहे, असंही मत व्यक्त करण्यात आले.
गौतमी पाटीलचा धांगडधिंगा कमी होणार?
डीजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असेही यावेळी म्हटले गेले. डान्सर गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधण्यात आला. गौतमी पाटीलचा एका अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर गौतमी पाटील पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. या प्रकारानंतर गौतमीने सर्वांची माफी मागून तशी चूक पुन्हा होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, तमाशा थिएटरमध्ये डीजेला बंदी करण्यात आल्याने आता गौतमी पाटीलचा धांगडधिंगा कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे.