मुंबई: शाहरुख खानचा आगामी आणि या वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ 21 डिसेंबर रोजी रिलीजसाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचे परदेशात अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची चांगली कामगिरी होत आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने गुरुवारी 300 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2 कोटी ते 50 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
पिंकव्हिलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ‘डंकी’चे परदेशात अॅडव्हान्स बुकिंग सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. चित्रपटाने गुरुवारी सुरुवातीच्या दिवशी 2 कोटी ते 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि असे म्हटले जात आहे की, या आठवड्याच्या अखेरीस चित्रपट 500 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 4 कोटींहून अधिक कमाई करेल. रिपोर्टनुसार, यासह ‘डंकी’ रिलीजपूर्वी प्रिसेल्समध्ये बॉलीवूडसाठी वर्षातील तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
कॅनडामध्ये चांगला प्रतिसाद
‘डंकी’पूर्वी शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांनीही अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगले कलेक्शन केले होते. परदेशात अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने अमेरिकेत सर्वाधिक कमाई केली आहे. बुधवारीच ‘डंकी’ने जवळपास एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कॅनडामध्ये दोन दिवसांपूर्वी चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती, त्यामुळे चित्रपटाला तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटातून शाहरुख खान पहिल्यांदाच राजकुमार हिराणीसोबत काम करत आहे. ”डंकी’मध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.