दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने तिला नियमित जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीला जॅकलिन कोर्टात हजर होती.
सुनावणीसाठी जॅकलिन आजही वकिलाच्या वेशभूषेत कोर्टात पोहोचली होती. 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास तिला मनाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचे जॅकलिनने न्यायालयात सांगितले होते. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु ईडीने मला फक्त त्रास दिला आहे, असा आरोप जॅकलिनने केला होता.
ईडीने म्हटले होते की, त्यांच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना नियमित जामीन देऊ नये. यावर कोर्टाने ईडीची कानउघाडणी करत जर पुरावे होते, तर जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला.