मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडाच्या अडचणी आता वाढल्या आहेत. त्याच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय देवरकोंडाने आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

अभिनेत्या विरुद्ध तक्रार ‘जॉइंट अॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कमिटी’चे अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार यांनी दाखल केली आहे. ‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या कार्यक्रमात देवेराकोंडाने केलेल्या टिप्पण्या आक्षेपार्ह होत्या आणि आदिवासी समुदायाच्या भावना दुखवणाऱ्या होत्या, असा दावा त्यांनी केला. सायबराबादमधील रायदुर्गम पोलिस ठाण्यात देवेरकोंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजय देवरकोंडा याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेत्याने हे वक्तव्य तेव्हा केले होते जेव्हा काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत विजयला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अभिनेता म्हणाला होता की ‘जसे पूर्वी आदिवासी कुळे लढत असत, तसेच आता भारत आणि पाकिस्तान लढत आहेत.’ त्याचे हे वक्तव्य जॉइंट अॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी’ या संघटनेला आवडले नाही. अशातच त्याच्या विरुद्ध आता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संघटनेने अभिनेत्याच्या या वक्तव्याला आदिवासींचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आदिवासी समुदायाला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. पर्यावरण संरक्षणात त्यांची विशेष भूमिका आहे. अभिनेत्याने बोलताना वस्तुस्थिती लक्षात घ्यावी असं संघनेकडून सांगण्यात आलं आहे.
विजय देवरकोंडाच्या टिप्पणीवरून राज्यभर आदिवासी आणि आदिवासी गटांनी आंदोलन केले आहे. पोलिसांना अनेक ठिकाणांहून तक्रारी आल्या आहेत. आता रायदुर्गम पोलिसांनी विजय देवरकोंडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







