नवी दिल्ली: आपल्या खास हटके विनोदी स्टाईलने अनेकांना हसवणारे राजू श्रीवास्तव आयुष्याशी संघर्ष करीत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रुग्णालयात आहेत. राजू लवकर बरा व्हावा यासाठी देशभरातील लोक प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी कळताच कॉमेडियनचे अनेक चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
त्यांच्यावर डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अशात त्यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे. राजू यांची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाची वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे या प्रकरणी काहीही भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एका वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली राजूची प्रकृती पाहिली जात आहे. त्यांच्या शरीरात जो संसर्ग विकसित झाला होता तो आता कमी होत आहेत.
राजूच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कॉमेडियनच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र आता पुन्हा राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने चाहत्यांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.