पुणे: ‘बॉर्डर’च्या (Border 2) आठवणी तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ एन्ट्रीच घेतली नाही, तर कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले असून, विक्रमी कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘बॉर्डर २’ बद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटींची दणदणीत सलामी दिली. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) कमाईत २१ टक्क्यांची वाढ होऊन ३६.५ कोटींचा गल्ला जमवला. मात्र, खऱ्या अर्थाने चमत्कार घडला तो पहिल्या रविवारी. सुट्टीच्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटगृहे अक्षरशः फुल्ल केली आणि एकाच दिवसात ५४.५ कोटींची कमाई केली. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १२१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या वादळी घोडदौडीत ‘बॉर्डर २’ ने नुकत्याच गाजलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाचे दोन महत्त्वाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘धुरंधर’ने पहिल्या तीन दिवसांत १०६.५ कोटी कमवले होते, ज्याला ‘बॉर्डर २’ ने १२१ कोटींसह मागे टाकले. ‘धुरंधर’चा पहिल्या रविवारचा आकडा ४४.८० कोटी होता, तर ‘बॉर्डर २’ ने ५४.५ कोटी कमावून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.







