पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ लुटल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास तीन जणांनी दुचाकी अडवून दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर येथे राहणारे 46 वर्षीय नागरिक आणि त्यांची पत्नी अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ आल्यानंतर रस्त्याच्या अंधाऱ्या आणि निर्मनुष्य भागात दबा धरून बसलेल्या तीन जणांनी त्यांची दुचाकी अडवली.

आरोपींनी दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. दाम्पत्य घाबरलेल्या अवस्थेत असताना आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. घटनेनंतर दाम्पत्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पिंपरी परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले. तौहिद असल शहा (वय 23), सुलेमान यासिन शेख (वय 21) आणि रोहित बबलू सिंग (वय 20), तिघेही रा. पिंपरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी कात्रज घाट परिसरात अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या प्रकरणातील चोरीचा मुद्देमाल आणि इतर बाबींबाबतही पुढील तपास सुरू आहे.






