पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आव्हाळवाडी-सातववस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत अवघ्या पाच ते सहा दिवसांची नवजात बालिका आढळून आली. बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर एका रिक्षाचालकाने तत्काळ बॅग उघडून बालिकेला बाहेर काढले आणि तिला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. सध्या बालिकेवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

25 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक आकाश कोळी हे मांजरी येथून प्रवासी घेऊन पुणे स्टेशनच्या दिशेने जात होते. ते आव्हाळवाडीतील सातववस्ती परिसरात पोहोचले असता त्यांच्या रिक्षाच्या पुढे दुचाकीवरून दोन व्यक्ती जात होते. या दोघांनी रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाची बॅग फेकली आणि दुचाकीवरून वेगाने निघून गेल्याचे रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने आकाश कोळी यांनी रिक्षा थांबवून बॅगेजवळ जाऊन पाहिले. बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. तसेच बॅगेच्या फटीतून नवजात बालिकेचा पाय दिसत होता. त्यांनी तातडीने बॅग उघडली असता आत कपड्यात गुंडाळलेली नवजात बालिका आढळली. बाळाला बॅगेत बंद करून ठेवल्याने तिची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता होती.

आकाश कोळी यांनी कोणताही विलंब न करता बालिकेला आपल्या रिक्षातून वाघोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नवजात बालिकेला अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला सोडून देणाऱ्या व्यक्तींचा वाघोली पोलीस शोध घेत आहेत. घटनेच्या वेळी परिसरातून गेलेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. आकाश कोळी यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.






