मुंबई: मराठी लोककला आणि संस्कृतीला ‘मराठी बाणा’सारख्या महासोहळ्यातून जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे (Ashok Hande) यांच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माटुंगा येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. एका ५३ वर्षीय माथेफिरूने हांडे यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला.
ही घटना 1 मार्च रोजी माटुंग्याच्या मनमाला टँक रोडवरील ‘युनायटेड हाऊस’ परिसरात घडली. अशोक हांडे आपल्या कार्यालयात कामात व्यस्त असताना, स्थानिक रहिवासी प्रथमेश उनफोडे (बंटी) तिथे बॅट घेऊन आला. त्याने कार्यालयाच्या काचा फोडत गोंधळ घातला.
हांडे यांनी बाहेर येऊन विचारणा केली असता, आरोपीने त्यांच्या ‘मराठी बाणा’च्या गाड्या तिथे उभ्या केल्याबद्दल पार्किंगचे पैसे मागितले.हांडे यांनी अवैध वसुलीला विरोध करताच, आरोपीने संतापाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हांडे यांच्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले आहेत.
आरोपीचा उन्माद इतका होता की त्याने पोलिसांशी हुज्जत घातली, त्यांच्या अंगावर धावून गेला आणि शिवीगाळ केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







