पुणे: बापाचं काळीज लेकीसाठी किती हळवं असतं आणि तिच्यावर वेळ आली तर तो किती आक्रमक होऊ शकतो, याचा प्रत्यय लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील MIT महाविद्यालयात आला. गेल्या 15 दिवसांपासून लेकीला छळणाऱ्या टवाळखोर विद्यार्थ्याला तिच्या वडिलांनी भर कॅम्पसमध्ये गाठलं आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली.

संबंधित हुल्लडबाज विद्यार्थी पीडित तरुणीला गेल्या दोन आठवड्यांपासून ऑनलाईन माध्यमातून सतत त्रास देत होता. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणीचा छळ जेव्हा मर्यादेबाहेर गेला, तेव्हा तिने धीर एकवटून ही बाब वडिलांना सांगितली. आपली मुलगी इतक्या मानसिक त्रासात आहे हे कळताच या बापाचा संयम सुटला. त्यांनी थेट महाविद्यालय गाठले आणि त्या तरुणाला जाब विचारला.
वडिलांनी त्या मुलाला जाब विचारताच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. मुलाची उद्दाम वृत्ती पाहून वडिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी सर्वांसमोर त्या टवाळखोराला बेदम चोप दिला. “पुन्हा माझ्या लेकीला त्रास दिला तर याद राख,” अशा सज्जड दमही दिला.







