नवी दिल्ली : सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज केल्याप्रकरणी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत. हे आदेश बिहारच्या न्यायालयाने दिले आहेत.
एकता कपूरच्या ट्रिपल एक्स वेबसीरीजच्या सिझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह दृश्य दाखविण्यात आले होते. सैन्याचे जवान जेव्हा देशसेवेत असतात तेव्हा त्यांच्या पत्नी घरात परपुरुषांसोबत असतात, असे दाखविण्यात आले आहे. या प्रकरणी ६ जून २०२० ला माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली होती. तर एकता कपुरच्या या वेब सिरिजमधील द़ृश्यांवरून माजी सैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
माजी सैनिकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये एकता कपूर आणि शोभा कपूरला हजर राहून उत्तर देण्याचा समन्स जारी करण्यात आले होते. एकता कपूरच्या ऑफिसमध्ये हे समन्स पाठविण्यात आले होते.
दरम्यान, बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे. त्यांच्यावर ५२४/सी २०२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वेब सिरीजमध्ये सैनिकांच्या पत्नीचे पात्र आक्षेपार्ह दाखवल्याने हे प्रकरण एकता कपूरला महागात पडणार आहे.