Animal vs Sam Bahadur : मुंबई : १ डिसेंबरला दोन बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकले. पहिला म्हणजे ‘ॲनिमल’ आणि दुसरा म्हणजे ‘सॅम बहादुर’. दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चाही होती आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकताही होती. ॲनिमल चित्रपटाचे म्हणजे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर दुसरा चित्रपट म्हणजे सॅम बहादुर. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर सान्या मल्होत्रा व फातिमा सना शेख यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार सॅम बहादुरने पहिल्या दिवशी देशभरात ५.५ कोटी रुपयांची कमाई केली. तर ॲनिमल देशभरात तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ॲनिमलची कमाई ‘सॅम बहादुर’च्या तुलनेत खूप जास्त आहे. सॅम बहादुर हा भारताचे माजी लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल पदावर बढती मिळालेले पहिले भारतीय लष्कर अधिकारी सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. तर, ॲनिमल हा बाप-लेकाच्या विचित्र नात्याची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. सॅम बहादुर’च्या कमाईला ॲनिमल चित्रपटाने मोठा फटका बसला आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भारतात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी ५०.५० कोटी फक्त हिंदी भाषेत कमावले आहेत. तर १० कोटी रुपये तेलुगू भाषेत कमावले आहेत. उर्वरित कमाई ही कन्नड व मल्याळम भाषेतली आहे.
महिंद्रा ग्रुपचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी ‘सॅम बहादुर’ चित्रपटाबद्दल एक्सवर ट्विटर करत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सॅम माणेकशा यांच्या रुपातील विकीचे दोन फोटो शेअर केले होते. “जेव्हा एखादा देश त्यांच्या नायकांच्या कथा सांगणारे चित्रपट बनवतो, तेव्हा एक शक्तिशाली पुण्यचक्र तयार होते. खासकरून सैनिक, नेतृत्व आणि धैर्याच्या कथांबद्दल हे होतं. अशा चित्रपटांमुळे लोकांचा अभिमान आणि आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. जेव्हा लोकांना कळतं की कधीतरी त्यांच्या धैर्याचा सन्मान केला जाईल तेव्हा आणखी नायक उदयास येतात. हॉलीवूडने शतकानुशतके हे पुण्यचक्र निर्माण केले आहे. त्यामुळे रॉनी स्क्रूवाला आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटात त्रुटी आहेत, पण विकी कौशलने ज्याप्रमाणे स्वतःला सॅम बहादुर यांच्या रुपात अंगावर शहारे आणणाऱ्या आणि पुरस्कार विजेत्या व्यक्तिरेखेत रुपांतरित केलंय, ते कमाल आहे. हा चित्रपट पाहा आणि एका अस्सल भारतीय नायकाचा गौरव करा,” असं आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे