मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 18’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. मात्र, या शोच्या शूटिंगदरम्यान त्यांना दुखापत झाल्याचे समोर आले आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने त्यांना उठताना आणि उभे राहताना त्रास होत आहे. त्यामुळे नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे उभे राहून नव्हे, तर बसून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसले.

‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन सुरुवातीला मध्यभागी उभे राहून आपले खास अंदाजातील प्रास्ताविक भाषण करतात. मात्र, यावेळी दुखापतीमुळे त्यांनी हा नेहमीचा क्रम बदलला. कार्यक्रमाची सुरुवात करताना ते खुर्चीवर बसले होते.

अमिताभ बच्चन यांनी स्वतःच त्यांच्या दुखापतीची माहिती प्रेक्षकांना दिली. शूटिंगदरम्यान पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर उभे राहणे काहीसे त्रासदायक होत असल्याने सुरुवातीचे भाषण बसूनच करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, दुखापत झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमातील सूत्रसंचालन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. स्पर्धकांसोबत संवाद साधण्यासाठी ते उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून दुखापत गंभीर स्वरूपाची नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. अमिताभ बच्च यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर प्रेक्षक आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त करत ते लवकर बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या.







