मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण ठाण्यात उमटले असून, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास आता ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा थेट आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दुसरीकडे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. आपल्या घरी असा कोणताही कट शिजला नसल्याचे सांगत, आरोप करणाऱ्यांनी त्याबाबत पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले. पूर्णेकर यांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असणे स्वाभाविक आहे, परंतु या दुर्दैवी घटनेचे राजकारण करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते येथे येत आहेत, असा पलटवारही त्यांनी केला. प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबाचे नाव वापरून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची जोरदार मागणी देखील केली आहे . या राजकीय दबावानंतर पोलीस आणि गुन्हे शाखेने प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला. या जबाबात घटनेची सविस्तर माहिती आणि संशयितांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘पप्या शिंदे’ याच्यासह काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या डीसीपी अमर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.







