पुणे : मुंबई-बंगळुरूनंतर महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारत मिळणार आहे.नागपूर आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान लवकरच ‘स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होण्याची शक्यता आहे. विदर्भाची उपराजधानी नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण व आयटीचे केंद्र असलेल्या पुण्यादरम्यान रोज हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक प्रवास करतात. या नवीन स्लीपर ट्रेनमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या नागपूर-पुणे मार्गावर बसून प्रवास करणारी (चेअरकार) वंदे भारत ट्रेन सुरू आहे. मात्र, या प्रवासाला तब्बल 12 तास लागत असल्यामुळे सलग एवढा वेळ बसून राहणे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसाठी त्रासदायक ठरते. रात्रीचा सुखकर प्रवास करता यावा यासाठी प्रवाशांकडून या मार्गावर स्लीपर वंदे भारतची मागणी केली जात होती.
प्रस्तावित स्लीपर वंदे भारतची प्रमुख वैशिष्ट्ये:

16 डब्यांची रचना: या आधुनिक ट्रेनमध्ये थ्री-टायर एसी, टू-टायर एसी आणि फर्स्ट क्लास एसी अशा तीन श्रेणी असणार आहेत.

वेग आणि सुविधा: ताशी 160 किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या गाडीत आरामदायी बर्थ, modern इंटीरियर आणि इतर अद्ययावत सुविधा असतील.
या जिल्ह्यांना फायदा: ही गाडी अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड या प्रमुख स्थानकांवर थांबण्याची शक्यता आहे.
मुंबई-बंगळुरू मार्गावरील स्लीपर वंदे भारतला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर रेल्वे प्रशासन नागपूर-पुणे मार्गाचा गांभीर्याने विचार करत आहे. ही ट्रेन प्रत्यक्षात आल्यास दोन्ही शहरांमधील अंतर कमी वेळात आणि अत्यंत सोयीस्करपणे पार करता येईल.






