पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील अमर कोर्टयार्ड सोसायटीमध्ये एका 11 वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची थरारक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत दामोदर गाढवे यांचा 11 वर्षांचा मुलगा समरजित सोसायटीच्या परिसरातील उद्यानात सायकल चालवत होता. यादरम्यान बेसमेंटमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने तो सायकल थांबवून बाजूला उभा राहिला. त्याच वेळी तिथून सुटलेल्या किंवा अनियंत्रित झालेल्या एका पिटबुल श्वानाने अचानक त्याच्यावर जोरदार झडप घातली. या हिंस्र हल्ल्यात कुत्र्याने मुलाच्या छातीवर जोरात चावा घेतला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगा खूप घाबरला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी कुत्र्याच्या मालकिणीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिनल महावीर माने (रा. अमर कोर्टयार्ड, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकिणीचे नाव आहे. आपल्या पाळीव प्राण्याला सुरक्षितपणे आणि नियंत्रणात न ठेवल्यामुळे तसेच इतर नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी कोणतीही खबरदारी न घेतल्याबद्दल ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील सोसायट्यांमध्ये पाळीव कुत्री पाळण्याचे प्रमाण वाढत असले, तरी त्यांच्या सुरक्षित हालचालींकडे दुर्लक्ष केल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा आक्रमक कुत्र्यांच्या मालकांवर कठोर नियम लागू करण्याची मागणी नागरिक करत आहेत








