पुणे : अभिनेता अजय देवगण याचा ‘थँक गॉड’ (Thank God) हा चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने ‘थँक गॉड’चा ट्रेलर पाहिल्यानंतर या दोघांच्या विरोधात जौनपूर कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.सामाजिक संस्थेच्या लोकांनी गुरुवारी कँट पोलीस ठाण्यात चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण यांच्याशिवाय रकुल प्रीत सिंह देखील ‘थँक गॉड’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हिंदू पुराणानुसार चित्रगुप्त लोकांच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशेब ठेवतो, त्याला कर्मदेवता असेही म्हणतात. यामुळे त्याचे ज्या पद्धतीने चित्रण या चित्रपटात केले आहे ते योग्य नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘थँक गॉड’च्या ट्रेलरमध्ये चित्रगुप्ताला मॉडर्न लूकमध्ये सूट-बूट घातलेला दाखवण्यात आला आहे, असे हिमांशू श्रीवास्तव यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
चित्रगुप्त हे पात्र अजय देवगण साकारात आहे. त्याची भाषाही खूप मजेदार आहे. वाराणसीमध्येही या चित्रपटाबाबत रोष उफाळला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान श्रीचित्रगुप्तांचा अपमान केल्याचा आरोप करत लोक आवाज उठवत आहेत. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.