मुंबई: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर अलीकडेच सुरू झालेली ‘मेहंदी वाला घर’ ही मालिका उज्जैनमधल्या अग्रवाल कुटुंबाची एक हृदयस्पर्शी कथा सांगते. कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत दाखवताना ही कथा प्रतिकूल परिस्थितीत हे कुटुंब एकसंध राहू शकेल का? ही उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात जागी करते. व्यक्तीवाद आणि आधुनिकीकरणाच्या नावाने हे बंध तोडून एकमेकांपासून दूर झालेल्या कुटुंबाला कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागते, याचाही शोध ही मालिका घेते. सध्या सुरू असलेल्या कथानकात प्रेक्षकांनी पाहिले की, कधी गुण्या-गोविंदाने नांदणारे अग्रवाल कुटुंब काही परिस्थितीमुळे कसे एकमेकांपासून दुरावले आहे आणि नात्याचे बंध तोडून दूर जाऊ लागले आहेत. आता आपल्या लाडक्या मनोज (करण मेहरा) पापांसाठी हे तुटलेले बंध पुन्हा जुळवण्याचा निर्धार मौलीने केला आहे. अभिनेता करण मेहराने मालिकेचे कथानक, आपली व्यक्तिरेखा मनोज अग्रवाल याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
‘मेहंदी वाला घर’ मालिकेत तू साकारत असलेल्या मनोज या तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील? कथेमध्ये या पात्राचे योगदान काय आहे?
मनोज एक ‘आदर्श मुलगा’ आहे, ज्याच्यासाठी आपले कुटुंब हेच सर्व काही आहे. तो महत्त्वाकांक्षी पण शांत स्वभावाचा आहे. त्याच्या गोड स्वभावामुळे त्याची भावंडे आणि ताऊजी, जानकी मां यांचा तो सगळ्यात लाडका आहे. आपल्या कुटुंबाची मान ताठ करण्यासाठी त्याला डॉक्टर बनायचे असते, पण काही परिस्थितीमुळे, अजंता या आपल्या प्रेमासाठी त्याला घर सोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. त्याच्या या निर्णयामुळे उज्जैनच्या त्याच्या घरात खूप संघर्ष होतो. कथानक पुढे सरकते आणि मनोजला कौटुंबिक नात्यांचे महत्त्व उमगते. अखेरीस तो मौलीच्या मदतीने आपली चूक दुरुस्त करून पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतो. मौलीला तो आपल्या स्वतःच्या मुलीसारखीच वागणूक देतो.
या व्यक्तिरेखेसाठी तू तयारी कशी केलीस?
एका संयुक्त कुटुंबाभोवती फिरणारे हे कथानक मला फार आवडले. ही कहाणी अगदी खरीखुरी वाटते, कारण आपल्यापैकी बरेच जण अशाच कुटुंबात वाढलो आहोत. ते दिवस पुन्हा जगत असल्यासारखे मला वाटले. आणि या व्यक्तिरेखेचे माझ्याशी बरेच साम्य आहे. मालिकेचे शूटिंग सुरू करण्याअगोदर आम्ही संहितेचे वाचन केले. आमच्या क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शक सचिनसोबत काही सत्रे केली, ज्यात त्यांनी आम्हाला मौलिक मार्गदर्शन केले. हळूहळू करत आम्ही सर्वांनी मिळून ही व्यक्तिरेखा उभी केली. ही संपूर्ण प्रक्रिया अशी होती.
मनोज ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही व्यक्तिरेखा साकारताना तुझा दृष्टिकोन काय होता?
प्रत्येक व्यक्तिरेखेची एक खास गरज असते. मला वाटते, जोपर्यंत तुम्ही त्या पात्राच्या भावना अनुभवू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही ते पात्र चांगले साकारू शकत नाही. मनोजच्या बाबतीत सांगायचे तर, मला अनेक फ्लॅशबॅक दृश्ये आहेत, ज्यामध्ये ते पात्र अधिक उत्साही आणि तरतरीत दिसते. पण आज मात्र मनोज त्यापेक्षा खूप वेगळा, अधिक परिपक्व आहे. परिपक्व झालेल्या मनोजला जबाबदारीची जाणीव आहे. त्याची अभिव्यक्ती अधिक मार्मिक आहे. हे पात्र साकारताना मी या फरकांवर लक्ष देतो. या पात्राच्या प्रवासानुसार मी माझे आचरण, अभिव्यक्ती आणि संवाद फेक यात अनुरूप बदल करतो. सुदैवाने आमचा दिग्दर्शक खूप छान आहे. तो देखील याकडे बारकाईने लक्ष देतो की, मी हे बारकावे प्रभावी पद्धतीने कसे साकारू शकतो. या गोष्टीची मला ही व्यक्तिरेखा साकारण्यात खूप मदत झाली आहे.
या मालिकेतील इतर व्यक्तिरेखा आणि मनोज यांचे पडद्यावर आणि पडद्याच्या मागील नाते कसे आहे?
पडद्याच्या मागे आमच्यात मस्त सख्य आहे. आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत. मी या आधी विभाजी आणि पेंटलसरांसोबत काम केले आहे. रवी आणि रुषदला मी आधीपासून ओळखत होतो. पण एकत्र काम करत असल्याने आम्ही आणखी जवळ आलो आहोत. आता एका मोठ्या आनंदी कुटुंबासारखे आम्ही एकत्र नांदतो. पडद्यावरील आमचे नाते गुंतागुंतीचे आहे. आमच्यातील तणावपूर्ण परिस्थिती आमच्या परस्पर संबंधातून व्यक्त होते. पण कथानक पुढे सरकेल तसे नात्यातील बदल प्रेक्षकांना जाणवतील.
‘मेहंदी वाला घर’ मालिकेतून प्रेक्षकांनी काय शिकावे काय घ्यावे असे तुला वाटते?
‘मेहंदी वाला घर’ मालिकेचे संयुक्त कुटुंब आणि त्यात राहणाऱ्या लोकांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध साकारण्यात आहे. संयुक्त कुटुंब पद्धत आपल्या समाजातून हळूहळू लुप्त होत चालली आहे. छोट्या शहरांत अजूनही ही पद्धत थोड्या फार प्रमाणात दिसते, पण इतर ठिकाणी मात्र विभक्त कुटुंबांचे प्रमाणच अधिक आहे. आमच्या या मालिकेच्या माध्यमातून आम्ही आपल्या कौटुंबिक नात्यांचे महत्त्व आणि त्यांची ताकद यावर भर दिला आहे. आवश्यकता असेल तेव्हा कुटुंब कसे पाठीशी उभे राहते हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जे आजच्या वेगवान युगात अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. ऐक्याची लक्षणीयता दाखवून देण्यावर आणि परिस्थिती कोणतीही असो, तुमचे कुटुंब तुमच्या सोबत असतेच हा संदेश अधोरेखित करण्यावर या मालिकेचा भर आहे. हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की, प्रेक्षक आमच्याइतकेच या विषयाशी तद्रूप होतील!