नवी दिल्ली: कथित गुंड सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीच्या ताज्या चौकशीला बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिसने बुधवारी दांडी मारली. त्यामुळे याप्रकरणात ईडीकडून अभिनेत्रीला नवीन समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आतापर्यंत याप्रकरणात जवळपास पाच वेळेस जॅकलीनची चौकशी केली आहे.
मनी लॉड्रिंग प्रकरणात नवीन माहिती हाती लागल्याने ईडीने जॅकलीन फर्नाडिसला चौकशीसाठी बोलवले होते. परंतु जॅकलीन चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाली नाही. आरोग्य विषयक कारणांमुळे जॅकलीन चौकशीला येऊ न शकल्याची माहिती तिच्या वकिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच ईडीकडून अभिनेत्रीला नवीन समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंह हिच्यासह अनेक हाय प्रोफाईल लोकांची कथितरीत्या २०० कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिसची चौकशी सुरू आहे. गुन्ह्याच्या माध्यमातून कमावलेल्या अवैध पैशातून चंद्रशेखर जॅकलीनसाठी महागाड्या भेटवस्तू खरेदी करत होता, असा ईडीचा आरोप आहे. याप्रकरणात २०२२ साली तपास संस्थेने एक आरोपपत्र देखील दाखल केले होते. यात चंद्रशेखरची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असताना देखील जॅकलीन त्याच्याकडून मौल्यवान भेटवस्तू घेत असल्याचे म्हटले होते. उल्लेखनीय बाब म्हणे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक चौकशीत जॅकलीनने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.