चेन्नई: अभिनेता आणि राजकारणी विजयकांत यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत (७१ वर्षे) यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमडीकेचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. विजयकांत जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाल्याचे त्यांनी ट्विट केले. तमिळ चित्रपट जगतातील एक दिग्गज ज्यांनी करिष्माई अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. एक राजकीय नेता म्हणून, ते सार्वजनिक सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय परिदृश्यावर कायमचा प्रभाव पडला. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कठीण आहे, असंही मोदी म्हणाले.
2005 मध्ये डीएमडीकेची स्थापना
- अभिनेता विजयकांत यांनी 2005 मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पार्टीची स्थापना केली. DMDK 2011 ते 2016 पर्यंत तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.
- 2006 मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व 234 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 8.38% मते मिळाली.
- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षाची अशीच स्थिती होती . पक्षाने राज्यातील 40 पैकी 39 लोकसभेच्या जागा लढवल्या, पण एकही जागा जिंकली नाही. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजयकांत यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही.
- 2011 मध्ये विजयकांत यांच्या पक्षाने 41 जागांवर निवडणूक लढवली आणि 29 जागा जिंकल्या. या निवडणुकीत डीएमडीके हा जयललिता यांच्या पक्षानंतर (एआयएडीएमके) दुसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि विजयकांत विरोधी पक्षनेते बनले. मात्र, त्यानंतर 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
- त्याचप्रमाणे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमडीकेला एकही जागा जिंकता आली नाही.