मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक (वय-६६) यांचे आज गुरुवारी (ता.९) पहाटे निधन झाले आहे. याची माहिती अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करून म्हणाले आहेत कि, मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, अशी मनातील घालमेलही अनुपम खेर यांनी या ट्विटमधून व्यक्त केली आहे.
सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये हरियाणाच्या महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपले शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. १९७८मध्ये तिथून ते पास झाले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतले.
सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी १००हून अधिक सिनेमात काम केलं. १९९३मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.