-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा एकदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाखले यांनी दिली.
मुक्त विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आगामी काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सेवा, सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने शिक्षणक्रम पूर्ण करता येणार आहेत, अशा माहिती डॉ. वामन नाखले यांनी दिली.
मुक्त विद्यापीठाचे अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र स्तरावरील (32), पदविका स्तरावरील (50), पदवी स्तरावरील (16) आणि पदव्युत्तर पदवी सत्रावरील (33) शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत. यात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी या शिक्षणक्रमांचा नव्याने समावेश केला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेतील पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षणक्रम तसेच, उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम यूजीसीच्या मान्यतेने सुरु केले जात आहेत. तसेच, प्रशासकीय सेवांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन लोक प्रशासनाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध केला आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाखले यांनी दिली. सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac अथवा www.ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.