पुणे : पुण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उद्या सोमवार (ता.२०) पासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिली.
महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्या या खूप काळापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीला काळ्या फिती लावून काम केले, तर १६ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. विविध प्रलंबित मागण्यांबाबत समितीची उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र चर्चेनंतरही सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे समितीने सोमवारपासून कामबंद आंदोलन करणार आहे.
दरम्यान, या आंदोलनाचा फटका २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांनाही बसणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यात सरकार जबाबदार असेल, असेही संघटनेने स्पष्ट केले.
सेवक संयुक्त कृती समितीच्या मागण्या पुढीलप्रमाणे…
१)सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा शासन निर्णय पुनरुज्जीवित करणे
२)दहा, वीस, तीस लाभाची योजना लागू करणे
३) सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देणे,४) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती करण
५) २००५ नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
६)१४१० विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करणे