दीपक खिलारे
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येकाने जीवनामध्ये यशस्वी होणेसाठी वाटचाल करावी, असे आवाहन माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला रविवारी (ता.१९) शुभेच्छा व्यक्त केल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची उभारणी केली. छञपती शिवाजी महाराज हे समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. महाराजांनी राबविलेल्या धोरणांमुळेच आजही समाजिक एकोपा आपणास दिसून येत आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकास न्याय दिला, जगण्याचा हक्क दिला. अठरा पगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. प्रशासन हे सर्वसामान्य जनतेसाठी राबवायचे असते, याचा आदर्श त्यांनी घालून दिले.
स्त्रियांना सन्मान दिला, जनतेला त्यांनी सुरक्षितता दिली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांची जगाला दखल घ्यावी लागली, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले. शिवजयंतीनिमित्त मंडळांनी मिरवणुकीबरोबर सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.