पुणे : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास दहावी आणि बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तसेच परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाने दिला आहे.
सोमवारी (ता. १३ ) शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी ही माहिती दिली.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी दहावी आणि बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे परीक्षेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, कार्याध्यक्ष विनोद गोरे आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती २००५ पासून बंद आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके शिक्षकेतर कर्मचारी राहिले आहेत. अशा परिस्थितीत शाळांमधील रिक्त पदे आकृतीबंधानुसार भरण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत असतांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक १०, २०, ३० (सेवा वर्षे) योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू होत नसल्याने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना हार पत्कारावी लागली. यापुढेही ही योजना लागू होणार नसल्यास निवडणुकीत मतांच्या माध्यमातून कर्मचारी आपली शक्ती दाखवतील.
आतापर्यंत केवळ आश्वासने देऊन प्रत्यक्षात निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे मागण्या पूर्ण न झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा कालावधीत कोणतेही काम न करण्याचा इशारा खांडेकर यांनी दिला.