सागर जगदाळे
भिगवण : आजच्या मुलींच्या यशाची वैचारीक पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी १८ व्या शतकातच करून ठेवली होती. या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी”, असे प्रतिपादन सुहास गलांडे यांनी येथील कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात केले.
कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते.
डॉ. वाळुंज म्हणाले, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य काळाच्या पुढे जाणारे होते. पुणे विद्यापीठाचे नामांतर करुन त्यास सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे हे सावित्रीबाई यांच्या जीवनातील त्यागाला व समाजाप्रती समर्पणाच्या भावणेला साजेशे होते. एवढेच नव्हे तर त्यात स्त्रीयांप्रती समताभाव प्रदर्शित होतो.”
गलांडे म्हणाले की, “आजचे जग हे आपणासारख़्या सर्वसामान्य परंतु समाजाप्रती दुरदृष्टी आणि व्यापक विचारांचा कृतिशील आधार असलेल्या माणसांनी घडविलेले आहे. त्यांना आपण महापुरुष संबोधतो त्यांच्या कार्यातून आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घेऊन कार्यरत व्हायला हवे.”
यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. पद्माकर गाडेकर, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. कविता देवकाते, प्रा. शाम सातर्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी तर आभार प्रा. भाऊसाहेब सकुंडे यांनी मानले.