लोणी काळभोर : गेल्या दोन वर्षात कोरोनाने भारतासह जगात धुमाकूळ घातला आहे. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र कोरोना महामारीमध्ये अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहे. अशा मुलांचे शैक्षणिक दायित्व सरकारने स्विकारावे. अशी मागणी केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्याकडे लोणी काळभोर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रेणुका सिंह शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी पुण्यात आल्या आहेत. शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी आयटी, सोशल मिडीया प्रकोष्ठ, युवामोर्चा पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यासाठी वाघोली येथे मेळाव्याचे आयोजन काल गुरुवारी (ता.१५) करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्याकडे लोणी काळभोर भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांचे सरकारने दायित्व स्विकारावे. मुलांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपयांची आर्थिक तरतूद यासह इतर कल्याणकारी योजना या निराधार मुलांसाठी राबवाव्यात. अशा मागण्यांचे निवेदन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री श्रीमती रेणुकाजी सिंह यांना दिले आहे. त्याचबरोबर अशा अनेक मुलांचे शिक्षण हे आर्थिक अडचणींमुळे थांबले असून त्याबाबत त्वरित कारवाई करावी. अशी विनंती देखील करण्यात आली आहे.