नवी दिल्ली: शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ही अर्ज प्रक्रिया 2 जून 2025 पासून सुरू आहे.
या योजनेअंतर्गत यंदा विद्यार्थ्यांना प्रथम ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ करणे आवश्यक असून, त्यानंतर संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती व वारंवार विचारले जाणारे प्रश्न https://scholarships.gov.in/studentFAQs या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आठवी नंतर शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करणे व त्यांना बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
दरवर्षी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेत यशस्वी ठरलेल्या इयत्ता नववीतील एक लाख विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 12,000 शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती दहावी ते बारावीपर्यंत शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे नूतनीकरण पद्धतीने दिली जाते. मात्र, ही योजना केवळ स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
31 ऑगस्ट 2025 पर्यंत 85,420 नवीन व 1,72,027 नूतनीकरण अर्ज अंतिम स्वरूपात सादर झाले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटींनुसार, पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.50 लाखांपेक्षा जास्त नसावे, तसेच विद्यार्थ्यांनी सातवीत किमान 55% गुण मिळवलेले असावेत (SC/ST विद्यार्थ्यांसाठी 5% सवलत लागू आहे).
अर्ज पडताळणीसाठी दोन स्तरांची व्यवस्था
पहिला स्तर: संस्थेतील नोडल अधिकारी (INO) – अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025
दुसरा स्तर: जिल्हा नोडल अधिकारी (DNO) – अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025
टीप: इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित शाळा किंवा जिल्हा नोडल अधिकाऱ्याशी वेळेत संपर्क साधावा.







