पुणे : इलेक्ट्रिक डबलडेकर (Pune Double Decker Bus) बससेवा शहरातील आयटी हब (Pune IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील नोकरदार नागरिकांसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळावा यासाठी महापालिका आणि पीएमपीएमएलतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

या उपक्रमाचा भाग म्हणून आज कात्रज आगार ते हिंजवडी दरम्यान डबलडेकर इलेक्ट्रिक बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या वेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे उपस्थित होते.
यावेळी देवरे म्हणाले, “हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या परिसरातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने चेन्नई येथील स्विच कंपनीकडून एक इलेक्ट्रिक डबलडेकर बस मागवली आहे. एका बसची किंमत 2 कोटी रुपये असून त्यात एकूण 85 प्रवाशांची आसनव्यवस्था आहे. खालच्या मजल्यावर 45 आणि वरच्या मजल्यावर 40 प्रवासी बसू शकतात. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून प्रवासादरम्यान सुरक्षेवर सतत लक्ष ठेवणे शक्य होईल.”
तसेच, चार मार्गांवर 10 ते 15 दिवस ही चाचणी घेण्यात येणार असून, सर्व मार्गांवर चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीपर्यंत पुणेकरांसाठी डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही देवरे यांनी स्पष्ट केले.







