-संतोष पवार
पळसदेव : राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे 10 नोव्हेंबरला घेतली जाणार आहे . त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे . राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक या पदासाठी उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील पदे भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.
परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेशपत्राची मुद्रित प्रत काढून घेता येणार आहे. दहा नोव्हेंबर रोजी परीक्षेतील पेपर 1 सकाळी साडेदहा ते एक या वेळेत तर दुपारी दोन ते साडेचार या वेळेत पेपर 2 होणार आहे. परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाइन भरणे आवश्यक आहे . अर्ज भरणे, शुल्क याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे . मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल.
निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाइन अर्जातील माहिती आणि मूळ कागदपत्रात तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे .