उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांसाठी जगताना शिक्षकांनी आपल्या मनातील संवेदनशील माणूस जागा केला पाहिजे. आपल्या जगण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचे अंतर्मन ओळखता आले पाहिजे. विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी मित्रत्वाचे नाते ठेवावे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जागृकतेने कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी व्यक्त केले.
वाघोली (ता. हवेली) येथील बी. जे. एस महाविद्यालय वाघोली येथे हवेली तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्यासाठी आयोजित बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेसाहेब लोंढे बोलत होते.
यावेळी विस्ताराधिकारी ज्ञानदेव खोसे, केंद्र प्रमुख अंकुश बडे, मोहन भालचिम, बी.जे.एस विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांचेसह हवेली तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, विषय तज्ञ, विशेषतज्ञ, विशेष शिक्षक आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना राजेसाहेब लोंढे म्हणाले, “म्हणाले इंटरनेटच्या वापरामुळे मुलांच्यात चिडचिडेपणा वाढलेला आहे. आपली मुले कोणते ॲप पाहतात ते हिंसाचाराच्या गेम पहातात का? याकडे लक्ष देऊन त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त केले पाहिजे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता दिपाली जोगदंडे यांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे, मुलांशी मैत्री पूर्ण संबध जोपासत, शैक्षणिक वातावरण आनंददायी ठेवावे.
”सेव्ह द चिल्ड्रन” या संस्थेचे हनुमंत पवार, संदीप जाधव, उमेद धावारे, सुनील जाधव, पृथ्वीराज काळे, राधा पाचपुते,विशेष शिक्षक संतोष देशमुख यांनी बालकांचे हक्क, सायबर सुरक्षितता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख अंकुश बडे, सूत्रसंचालन विशेष शिक्षक संतोष देशमुख यांनी केले तर आभार प्रभारी केंद्रप्रमुख अमोल लाड यांनी मानले.