पुणे : शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, जागृत संघटनांनी आवाज उठून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा घेण्यात आली आहे.
यामुळे अनेक संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर शॉर्टहँडची परीक्षा सोमवारी (ता.२८) दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने संगणक, लघुलेखन आणि टायपिंगच्या परीक्षा घेण्यात येतात. मात्र जुलै २०२२ मध्ये झालेल्या शॉर्टहॅण्ड परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा सुध्दा एकाच वेळी आल्या होत्या.
दोन वर्षे अभ्यास, सराव व वेळ देऊन पुन्हा शॉटहॅण्ड परीक्षेला बसू न शकल्याने नोकरीच्या वाटा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
विद्यार्थ्यांची गैरसोय झाली झाली असल्याने कोल्हापूरच्या अभिलाषा नाईक, पुण्याचे हेमंत ढमढेरे यांनी टायपिंग संघटनेच्या माध्यमातून परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.
त्यानंतर परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता.२८) शॉर्टहँड परीक्षा घेण्यात आली.
दरम्यान, यावेळी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना पेढे वाटप करण्यात आले. तर विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अभिलाशा नाईक, हेमंत ढमढेरे व परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आभार मानले.
यावेळी बोलताना हेमंत ढमढेरे म्हणाले की, शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते. विद्यार्थ्यांनी खूप दिवस परिश्रम घेतले असताना परीक्षास मुकावे लागत होते.
परंतु संघटनेच्या माध्यमातून अभिलाषा नाईक व आम्ही पाठपुरावा केल्याने परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आदेशानुसार पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे.