लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी-महिबळेश्वर मुख्य राज्य मार्गालगत असणाऱ्या भिलार वाॅटर फाॅल पाॅंईंटवर एका हाॅटेलने बसेसचे पार्किंग केल्याने पर्यटकांची गैरसोय होत असून पर्यटकांना पाॅंईंट न पाहता पुढे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ता हाॅटेलच्या पार्किंगसाठी बांधला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पाचगणी महाबळेश्वर मुख्य मार्गालगत नारायण लाॅज परीसरात असणाऱ्या एका मोठ्या हाॅटेलमध्ये नेहमी समारंभ आयोजित केले जातात. यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात.
त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना या पाॅंईंटवर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पर्यटनाचा आनंद घेता येत नसल्याने हा रस्ता हाॅटेच्या पार्किंगसाठी बांधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यानिमिताने पार्किंगविषयी संबंधित हाॅटेलचे काही धोरण आहे की नाही? असा प्रश्न या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पडत आहे. मात्र ही बाब याच रस्त्याने जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही की ते मुद्दाम डोळेझाक करीत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधित विभागाने तातडीने यात लक्ष घालून हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याविषयी बोलताना पर्यावरणप्रेमी, शिवसेना युवासेनेचे तालुका प्रमुख नितीन भिलारे म्हणाले छोट्या मोठ्या बसेस रस्त्याच्या कडेला लागल्याने पाॅंईंट पुर्ण ब्लॉक होत असल्याने संबंधित हाॅटेल प्रशासनाला आम्ही समज दिली आहे. यावर त्यांनी तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलने हा प्रश्न आम्ही मार्गी लावू.